अरूण जेटली तुम्ही चेतन भगतच्या कादंबऱ्या फार वाचता असं दिसतंय, अशी खिल्ली प्रख्यात वकिल इंदिरा जयसिंग यांनी उडवली आहे. अरूण जेटली यांनी माओवाद्यांवर टिप्पणी करणारं ट्विट केलं असून त्याचा समाचार घेताना जयसिंग यांनी उपहासाचा आधार घेतला आहे.

“अर्धे माओवादी हे भारतीय लोकशाहीसाठी गंभीर धोका आहेत. स्वेच्छेने किंवा नकळत ते भूमीगतांचे उघड चेहरा बनत आहेत. दुर्दैवानं काही राजकीय पक्ष एनडीएला विरोद करण्यासाठी माओवाद्यांचा वापरतात. हा आकस आता लोकांनी ओळखायला हवा, त्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे,” असं ट्विट केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलं आहे.

पुणे पोलिसांनी पाच माओवाद्यांना नुकतंच पकडलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्याचा माओवाद्यांचा कट होता असा दावा सरकारी वकिलांनी पोलिस कोठडी मागताना केला. या प्रकरणी सरकारवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली. या सगळ्याचा संदर्भ जेटलींच्या ट्विटला आहे.

माओवादी व त्यांचा वापर करणारे भाजपा विरोधक यांचा खरा चेहरा लोकांनी ओळखावा व भाजपाबद्दल असलेला आकस जाणून घ्यावा असं जेटली यांनी सुचवलंय. तर जयसिंग यांनी जेटली यांच्या म्हणण्याची थट्टा उडवली असून जेटलींवर चेतन भगत यांची पुस्तकं अती वाचल्याचा परिणाम झाल्याची टिप्पणी केली आहे. तसेच चेतन भगतच्या पुस्तकांमध्ये काल्पनिकता असतेच शिवाय वाईट राजकारण व कायद्याचा अभाव या गोष्टीही असतात असं जयसिंग म्हणाल्या आहेत.