भारताच्या कुरापती काढण्याची सवय अशीच कायम चालू ठेवली तर तुम्हाला ती महागात पडेल, अशा शब्दांत भारताने शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या तसेच जम्मूमधील निरपराध भारतीय नागरिकांच्या घरांवर हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला खडसावले. त्याच वेळी सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांचे तरी राजकारण केले जाऊ नये. त्यामुळे सीमेवरील जवानांच्या मनावर विपरीत परिणाम होतो याचे भान राखा, अशा शब्दांत काँग्रेससह अन्य विरोधकांना भारतीय पंतप्रधानांनी टोला लगावला.
आता परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर मिळेल, असे भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला बजावले. तत्पूर्वी सततच्या गोळीबारानंतरही भारतीय पंतप्रधानांनी दोन राज्यांमधील निवडणूक प्रचारावरच लक्ष केंद्रीय केल्यामुळे विरोधकांनी मोदी यांच्यावर चांगलीच टीका केली होती.
त्या पाश्र्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पंतप्रधानांनी या प्रश्नावर भाष्य केले.
एका रात्रीत पाकिस्तानी फौजांनी १९२ किलोमीटरच्या संपूर्ण सीमेवर सर्वत्र तोफांचा व गोळ्यांचा मारा केला. २००३मध्ये झालेल्या शस्त्रसंधी कराराचा हा सर्वात मोठा भंग असून यात आठ जण ठार तर ८० नागरिक जखमी झाली आहेत. सुमारे ३० हजार नागरिक विस्थापित झाले आहेत.