केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सरचं निदान झालं आहे. उपचारासाठी अरुण जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात येणार आहे. द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून जलदगतीने शरिरातील इतर भागांमध्ये पसरतो. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारामुळे अरुण जेटली अर्थसंकल्प अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटलींवर सर्जरी करण्याचा निर्णय थोडा कठीण आहे कारण गतवर्षी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. सर्जरीमुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. यामुळे सध्या सर्जरी करणं त्यांच्या शरिरासाठी हानिकारक ठरु शकतं. अधिकृतपणे अरुण जेटली यांनी आपण दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन न्यूयॉर्कला जात असल्याचं सांगितलं आहे.

अरुण जेटलींच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मूत्रपिंड प्रत्यारोपणामुळे निर्माण झालेल्या अडचणी पाहता सर्जरी करुन लगेच डिस्चार्ज देणं रुग्णालयाला शक्य होणार नाही. दरम्यान अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गतवर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अरुण जेटली सुट्टीवर होते तेव्हा त्यांच्या वतीने पियूष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडला होता.