डीडीसीए प्रकरणात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ज्या प्रमाणे हवाला प्रकरणातून दोषमुक्त झाले, त्याच पद्धतीने जेटली हे सुद्धा लवकरच या प्रकरणी करण्यात येणाऱ्या खोट्या आरोपांतून दोषमुक्त होतील, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांपुढे केलेल्या भाषणात मोदींनी जेटली यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचेच निर्देश सदस्यांना दिले.
जेटली डीडीसीएचे अध्यक्ष असताना संघटनेच्या कारभारात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या नेत्यांनी केली आहे. या आरोपांनंतर जेटली यांनी दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात जेटली आणि अन्य नेत्यांविरोधात दहा कोटींचा बदनामीचा खटला दाखल केला आहे. त्याचबरोबर लोकसभेत केलेल्या भाषणात त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.
दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपच्या नेत्यांनी जेटलींवर गंभीर आरोप केले होते. दिल्लीमध्ये क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले होते. अरूण जेटली जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात कायम आहेत. तोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी केली होती.