श्रीकांत बहुलकर यांना भाषा सन्मान
अत्त्युच्च प्रतिष्ठेचे कोंदण लाभलेले, परंतु सरत्या वर्षांत देशातील वाढत्या असहिष्णुतेचे निषेधचिन्ह बनलेले साहित्य अकादमी पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. चित्रपट दिग्दर्शन, लघुपटनिर्मिती, साहित्य अशा कलेच्या सर्व प्रांतांत अमीट छाप उमटविणारे सव्यसाची प्रतिभेचे धनी अरुण खोपकर यांना त्यांच्या ‘चलत् चित्रव्यूह’ या चरित्रात्मक निबंधसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल प्रा. श्रीकांत बहुलकर यांना ‘भाषा सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे. आजपावेतो मराठी साहित्याच्या परिघाबाहेरच राहिलेल्या तांडय़ावरच्या व्यथांना कवितारूप देणारे प्रा. वीरा राठोड यांना यापूर्वीच युवा साहित्य पुरस्काराने, तर बालसाहित्यातील योगदानाबद्दल लीलाधर हेगडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २३ भाषांसाठी हे पुरस्कार जाहीर केले. कोकणी भाषेत उदय भेंबरे यांना ‘कर्ण पर्व’ या नाटकासाठी हा पुरस्कार घोषित झाला आहे. पुरस्कारप्राप्त पुस्तकांमध्ये सहा लघुकथासंग्रह, सहा कवितासंग्रह, चार कादंबऱ्या, दोन निबंधसंग्रह आणि एका आत्मवृत्ताचा समावेश आहे. सायरस मिस्त्री (इंग्रजी), के. आर. मीरा (मल्याळम), जसविंदर सिंग (पंजाबी) आणि मधू आचार्य ‘आशावादी’ (राजस्थानी) या कादंबरीकारांना त्यांच्या साहित्यकृतींबद्दल २०१५ साठीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. कुला सैकिया (आसामी), मनमोहन झा (मैथिली), गुप्त प्रधान (नेपाळी), विभूती पटनायक (उडिया), माया राही (सिंधी) आणि व्होल्गा (तेलगू) यांना लघुकथांसाठी हा पुरस्कार मिळणार आहे. ब्रजेंद्रकुमार ब्रह्म (बोडो), ध्यानसिंग (डोगरी), रामदर्श मिश्रा (हिंदी), के. व्ही. तिरूमलेश (कन्नड), क्षेत्री राजन (मणिपुरी) आणि रामशंकर अवस्थी (संस्कृत) यांना कवितासंग्रहांसाठी गौरविण्यात येईल. सन्मानचिन्ह, शाल व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. बहुलकर यांना अकादमीच्या अध्यक्षांच्या हस्ते एका विशेष समारंभात सन्मान प्रदान करण्यात येईल. पुरस्कारप्राप्त युवा साहित्यिकांना मागील महिन्यात मुंबईत झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले होते.

खोपकर यांचे कार्य
खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळालेले आहेत. भूपेन खक्कर, विवान सुंदरम, नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांवर बनविलेला ‘फिगर्स ऑफ थॉट’, वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ‘व्हॉल्युम झीरो’, कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणारा ‘नारायण गंगाराम सुर्वे’ हे लघुपट प्रेक्षकांची दाद घेऊन गेले.