आशियातील वयाच्या चाळिशीपर्यंतच्या गटातील श्रीमंत व्यक्तींमध्ये तंत्रज्ञान उद्योजक अरूण पुदूर यांचा पहिला क्रमांक लागला आहे. ‘वेल्थ एक्स’ या जागतिक संपत्तीविषयक कंपनीने म्हटले आहे की, पुदूर हे ‘सेलफ्रेम’ या सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष असून त्यांची संपत्ती ४ अब्ज डॉलर आहे. पुदूर हे ३७ वर्षांचे असून चेन्नईचे रहिवासी आहेत. त्यांनी १९९८ मध्ये ‘सेलफ्रेम’ ही कंपनी स्थापन केली. विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेली ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे वर्ड प्रोसेसर बनवते. स्थावर मालमत्ता व खाण उद्योगातही त्यांची गुंतवणूक आहे.
पुदूर यांच्यानंतर झाऊ याहुई या चीनच्या व्यक्तीचा दुसरा क्रमांक असून त्यांची संपत्ती २.२ अब्ज डॉलर्स आहे. चीनचे यादीवर प्रभुत्व असून त्यांच्या सहा उद्योजकांचा पहिल्या दहात समावेश आहे. जपानचे तीन जण यात आहेत. यातील नऊ उद्योजकांनी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करून मालमत्ता मिळवली आहे. ३५ वर्षांचे झांग बँगझिन यांनी  ताल एज्युकेशन ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून पैसा मिळवला आहे. त्यांची मालमत्ता २.२ अब्ज डॉलर्स आहे, ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बत्तीस वर्षांचे लिओ शेन हे जुमेई इंटरनॅशनल होल्डिंगचे अध्यक्ष अब्जाधीशांच्या यादीत आहेत. त्यांची ऑनलाईन कॉस्मेटिक रिटेलर कंपनी आहे. याओ जिनबो यांची मालमत्ता २.२ अब्ज डॉलर्स असून ते चौथे आहेत.