नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोदी सरकारला घेरले असताना भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी देखील नरेंद्र मोदी यांचा निर्णय विचार शून्य असल्याचे म्हटले आहे. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी मोदींनी चलनातून ५०० आणि १००० च्या नोटा हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कोणताही विचार केला नसल्याचे सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. शौरी यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सरकारच्या धोरणावर शंका व्यक्त करत निर्णयाचे स्वागत का होत आहे? याविषयी मत मांडले. मोदींनी काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी घेतलेल्या निर्णय धाडसी असल्याची चर्चेला शौरी यांनी पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला.

काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी ५०० आणि १००० च्या नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकार सांगत असल्यामुळे नागरिक या निर्णयाचे स्वागत करत आहेत. पण सरकारने घतलेला हा निर्णय विचारपूर्वक असल्याचे वाटत नाही, असे ते यावेळी म्हणाले. मोदींनी केलेला स्टाइक हा काळ्यापैशावर नव्हे तर दैनदिन व्यवहातील चलनावर केलेला स्ट्राइक असल्याचा आरोप शौरी यांनी केला.

ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशी मंडळी पैसा आपल्या जवळ ठेवत नाहीत. देशातील ५३ टक्के संपत्ती ही १ टक्के धनाढ्य लोकांकडे एकवटलेली आहे. तर १० टक्के लोकांकडे ८५ टक्के संपत्ती असल्याचे सांगत या लोकांकडे आणखी काळापैसा जमा होईल, असे शौरी यांनी म्हटले. रोजच्या व्यवहारामध्ये पैशाची देवाण घेवाणीवर सरकारच्या निर्णयामुळे गरिबांबर परिणाम झाल्याचे शौरी यावेळी म्हणाले. काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने कर आकारणी प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. अरुण शौरी यांनी यापूर्वी देखील सरकारच्या अनेक धोरणावरप्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.