आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी मंत्री अरुण शौरी यांनी केले आहे.

विरोधी पक्षांच्या मेळाव्यात त्यांनी सांगितले की, भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याची गरज आहे त्यामुळे मतविभाजन न होता भाजपचा पराभव निश्चित होईल. भाजप सरकार गेले पाहिजे यावर आता कुणाचेच दुमत नाही. विरोधी पक्षांनी भाजप सरकार हटवण्यासाठी एकी दाखवली पाहिजे, महाभारतातील अर्जुनाप्रमाणे एकाग्र होऊन एकीने विरोधकांनी भाजपशी लढत दिली पाहिजे. हे सोपे काम नाही. भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याची गरज आहे. देशासाठी हा त्याग करण्याची तयारी राजकीय पक्षांनी ठेवली पाहिजे. अरुण शौरी हे वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रात मंत्री होते.  मोदी-शहा दुकलीने लोकांचा विश्वास गमावला आहे कारण सरकार अनेक बाबतीत खोटे बोलले, अशी टीका शौरी यांनी यावेळी केली.

स्वातंत्र्याची दुसरी लढाई- एम. के. स्टालिन

द्रमुकचे अक्ष्यक्ष एम. के. स्टालिन म्हणाले की, लोकसभेची आगामी निवडणूक ही भाजपच्या मूलतत्त्ववादी हिंदुत्ववादाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय जनतेची दुसरी स्वातंत्र्य चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक जणांची धास्ती आहे. पुढील निवडणूक हा स्वातंत्र्यासाठीचा दुसरा लढा आहे.