देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सर्वसामान्य जनतेपासून करोना योद्ध्यांसह आजीमाजी मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आपल्या फिटनेसमुळे नुकतेच चर्चेत आलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांना देखील करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे त्यांनी स्वतः ट्वटिद्वारे सांगितले आहे.

“मी करोना तपासणीसाठी आरटी-पीसीआर टेस्ट करून घेतल्यानंतर माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी लक्षणंविरहीत व तंदुरुस्त आहे. तरी एसओपीनुसार आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, मी स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी एसओपीचे पालन करावे.” असे त्यांनी ट्विटद्वारे आवाहन केले आहे.

खांडू यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटवरुन नुकतेच काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये खांडू हे डोंगर दऱ्यांमधून, नद्यांच्या काठांवरुन ट्रेकिंग करताना दिसत आहेत. यावरुनच त्यांच्या फिटनेससंदर्भात चर्चा देखील सुरु झाल्या होत्या, शिवा त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला जात होता. नुकताच त्यांनी एक २४ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला होता.

११ तासांचा ट्रेक करुन खांडू हे त्यांच्या मोजक्या सहकाऱ्यांसहीत लुगुथांग या दूर्गम भागातील गावामध्ये गेले होते. तावांग जिल्ह्यामधील लुगुथांग या गावात जाऊन खांडू यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. हे गाव समुद्रसपाटीपासून १४ हजार ५०० फूट उंचीवर आहे. “२४ किमीचा ट्रेक, ११ तास शुद्ध हवा आणि निसर्गाचे सर्वोत्तम दर्शन,” अशा शब्दांमध्ये खांडू यांनी या ट्रेकचे ट्विटवर वर्णन केलं होतं.