अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबम तुकी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राज्यपाल जे. पी. राजखोवा यांच्याविरुद्ध तक्रार केली. राजखोवा यांनी राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते सत्तारूढ काँग्रेस पक्षात बंडखोरीला छुप्या पद्धतीने खतपाणी घालत असल्याची तक्रार तुकी यांनी मोदी यांच्याकडे केली. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन नियोजित वेळेपूर्वी बोलाविल्याने निर्माण झालेल्या राजकीय स्थितीचा सविस्तर अहवाल तुकी यांनी मोदी यांना सादर केला. सदर बाब न्यायप्रविष्ट असून गुवाहाटी उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. राज्यपालांनी आपली अथवा मंत्रिमंडळाची संमती न घेताच निर्णय घेतला, असेही तुकी म्हणाले.