अरूणाचल प्रदेशमध्ये भुताटकीच्या चर्चेमुळे मुख्यमंत्र्यांवर स्वत:चा बंगला सोडण्याची वेळ ओढावली. राजधानी इटानगरच्या निती विहार परिसरात असणाऱ्या या बंगल्यात गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री कालिखो पूल यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर या बंगल्यात भुताटकी असल्याची चर्चा रंगली होती. कालिखो पूल यांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनीच या बंगल्यातील एका नोकरानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यापूर्वी बंगल्यात वास्तव्याला असलेले अरूणाचलचे माजी मुख्यमंत्री दोर्जी खांडू आणि जारबोम गॅमलिन यांचाही अकाली मृत्यू झाला होता. त्यामुळे आता राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांचे या बंगल्यातील बस्तान इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात हा बंगला अतिथीगृह म्हणून वापरला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चोवना मेईन यांनी दिली. यापूर्वी बंगल्याच्या नुतनीकरणाचे काम करण्यात येणार आहे. मात्र, लोकांना या बंगल्यात भुताटकी असल्याचे वाटते. त्यामुळे याठिकाणी अतिथीगृह सुरू करण्यापूर्वी काही धार्मिक विधी केले जातील, असेही मेईन यांनी सांगितले.

दोर्जी खांडू यांच्या काळात हा बंगला बांधण्यात आला होता. १४ नोव्हेंबर २००९ मध्ये तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांच्याकडून विधिवत पूजन केल्यानंतर दोर्जी खांडू याठिकाणी राहण्यासाठी आले होते. मात्र, ३० एप्रिल २०११ मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खांडू यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हंगामी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारलेल्या जारबोम गॅमलिन यांचाही केवळ सहा महिन्यांत अचानकपणे मृत्यू झाला होता. त्यानंतर याठिकाणी राहण्यासाठी आलेल्या नाबाम तुकी यांची कारकीर्दही वादग्रस्त राहिली होती. सर्वप्रथम २०१५ मध्ये विशेष अधिवेशनात ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर १३ जुलै २०१६ मध्ये नाबाम तुकी यांची मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी योग्य ठरवली होती. मात्र, त्यानंतर केवळ चारच दिवसांत त्यांच्याच पक्षाच्या पेमा खांडू यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा कारभार सोपविण्यात आला होता. सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू हेदेखील या बंगल्यात राहत नसून त्यांचा मुक्काम स्वत:च्याच घरी आहे.