भारतात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारकडे जनतेचं बहुमत तर आहे. मात्र हे सरकार अत्याचारी अल्पसंख्याक आहे अशी बोचरी टीका प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलेल्या प्रश्नात त्यांनी हे उत्तर दिले आहे. सध्याच्या घडीला देशात तिरस्काराची विचारधारा पसरवली जाते आहे. जो मोदी सरकारविरोधात आवाज उठवतो त्याला तुरुंगात डांबलं जातं आहे. जमावाकडून केलेल्या न्यायाला योग्य ठरवलं जातंय. मेन स्ट्रीम मीडियाला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न होतो आहे. तसंच विरोधातला आवाज दाबला जातो आहे आणि हे सरकार स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतं आहे असं म्हणत प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत.

सध्याचा काळ हा तिरस्काराची विचारधारा पसरवणारा काळ आहे. ही विचारधारा नाझी विचारधारेवरुन प्रेरित आहे. राम मंदिराचं भूमिपूजन झालं त्याआधी काही दिवस शिक्षण प्रणालीत बदल करण्यात आले. हे बदल आरक्षण संपवणारे बदल आहेत. आरक्षण संपवलं तर त्यासाठी वेगळा पर्याय उपलब्ध करुन द्यायला हवा. मात्र मोदी सरकारला ते करायचं नाही. त्यांना सुशिक्षित नोकर आणि हुकुम पाळणारे लोक घडवायचे आहेत असाही आरोप अरुंधती रॉय यांनी केला. एका स्थानिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर मुख्य प्रवाहात असलेल्या मीडियाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न हे सरकार पूर्णपणे करतं आहे असाही आरोप त्यांनी केला.

भारतात जेव्हा आणबाणी लागू झाली होती तशीच काहीशी परिस्थिती आज आहे का? असं विचारलं असता अरुंधती रॉय म्हणाल्या, आणीबाणीसारखी परिस्थिती आज नाही, त्यापेक्षा वेगळी आहे. त्या काळात कायद्याचं पालन न करणाऱ्यांना अटक केली जात होती. त्यावेळी एका समुदायला दुसऱ्या समुदायाबाबत द्वेष वाटत नव्हता. सध्याच्या घडीला काही धार्मिक समुदाय हे हिंसेची भावना मनात बाळगून आहेत. हे सरकार त्यांना अभय देतं आहे असंही अरुंधती रॉय यांनी म्हटलं आहे. भारतात बहुसंख्यवाद आहे. मात्र मोदी सरकार हे अत्याचारी अल्पसंख्याक आहे असाही आरोप त्यांनी केला.