आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला असून माहिती अधिकारात एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात समोसे आणि चहावर एक कोटींहून जास्त पैसे खर्च झाले आहेत. याशिवाय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या दौ-यावर १२ लाख रुपये खर्च झाले आहेत.

दिल्ली सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयात २०१५-१६ मध्ये समोसे आणि चहावर २३.१२ लाख आणि २०१६-१७ दरम्यान एकूण ४६.५४ लाख रुपये खर्च झाले होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये समोसे आणि चहावर ३३.३६ लाखांचा खर्च झाला होता. माहिती अधिकारातूनच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून सचिवालय येथील कार्यालय आणि रेसिडन्स कॅम्प ऑफिसमध्ये समोसे आणि चहावर लाखो रुपये खर्च झाल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता हेमंत सिंह यांनी केलेल्या अर्जानंतर समोसे आणि चहावर एक कोटीहून जास्त खर्च झाल्याचं उघड झालं आहे.

मूळचे उत्तराखंडचे असणारे माहिती अधिकार कार्यकर्ता हेमंत यांनी समोसे आणि चहावर खर्च झालेले हे पैसे वाचवता आले असते असं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, ‘हा असा खर्च आहे जो टाळता येऊ शकला असता. हे पैसे त्या लोकांसाठी खर्च केले पाहिजेत ज्यांना एकवेळचं अन्न मिळत नाही. सरकार त्यांच्या हिताचा विचार करेल अशी आशा आहे’.

मुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल भगवान दास रोडवरील बंगल्यात शिफ्ट झाले होते. हा ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे. एकामध्ये ते आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि दुस-याचा कार्यालयीन कामासाठी वापर केला जातो.

जेवणावर खर्च केल्याने वादात येण्याची ही अरविंद केजरीवाल यांची पहिलीच वेळ नाही. याआधी आम आदमी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात १६ हजाराचं एक ताट ठेवण्यात आलं होतं. वाद झाल्यानंतर आम आदमी पक्षाने माघार घेत हवं तर नायब राज्यपाल चौकशी करु शकतात असं म्हटलं होतं.