नायब राज्यपालांच्या निवासस्थानी २४ तासांहून अधिक ठिय्या आंदोलन

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यातील संघर्ष विकोपाला दिल्ली प्रशासन वेठीला धरले गेले आहे. केजरीवाल आणि त्यांच्या तीन मंत्र्यांनी नायब राज्यपालांच्या निवासस्थानी ठिय्या मारला असून २४ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर मंगळवारी रात्रीपर्यंत तरी त्यांचे आंदोलन सुरूच होते.

मंत्री सत्येंद्र जैन आमरण उपोषणाला बसले आहेत. ‘आप’चे नगरसेवक आणि अन्य नेत्यांनी बैठक घेऊन आज, बुधवारी नायब राज्यपालाच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभर दिल्लीत मान्यवरांनीही हा संघर्ष संपवण्याचे आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. मात्र बैजल यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने भाजपकडून केजरीवाल यांची कोंडी करण्यात आल्याचे चित्र मंगळवारी दिसत होते.