आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही तोडगा नाही!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील ठिय्या शुक्रवारीही कायम होता. गेल्या सोमवारपासून केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानी आंदोलनाला बसले आहेत. बैजल यांनी अजूनही प्रतिसाद दिला नसल्याने पाचव्या दिवशीही ‘आप’च्या आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही.

दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संप संपवावा, या संपात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच, रेशनच्या वस्तू घरोघरी थेट पोहोचवाव्यात अशी मागणी ‘आप’ने केली आहे. त्यासाठी केजरीवाल आणि त्यांचे मंत्री बैजल यांची भेट मागत आहेत मात्र पाच दिवसांनंतरही नायब राज्यपालांनी ती नाकरली आहे. अधिकारी संपावर गेलेले नसल्याचे बैजल यांचे म्हणणे आहे. वास्तविक, अधिकाऱ्यांनी केजरीवाल सरकारशी असहकार पुकारला आहे. त्यामुळे दिल्ली सरकारची महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. यावर ताताडीने तोडगा काढण्याच्या ‘आप’च्या मागणीवर बैजल यांनी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.

आंदोलनाला वाढता पाठिंबा

केजरीवाल यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळू लागला आहे. मोदीविरोधक यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याशिवाय, सपचे अखिलेश यादव, त्रृणमूलच्या ममता बॅनर्जी, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू, माकपचे सीताराम येच्युरी, तामीळनाडूतील नवे राजकीय नेते कमलहालन, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आदींनी आपच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने मात्र ‘आप’विरोधात भूमिका घेतली आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याचा दावा ‘आप’ने केला आहे.

पंतप्रधानांच्या घरी रेशनची पाकिटे

‘आप’चे नेते आणि आमदारांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी रेशनची पाकिटे पाठवली आहेत. आता सोमवारपासून घरोघरी जाऊन ‘आप’च्या आंदोलनाची माहिती दिली जाईल आणि १० लाख स्वाक्षरींची मोहीम सुरू केली जाणार असल्याचे ‘आप’ने जाहीर केले आहे.