दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना मारहाण करण्यात आली अशी माहिती अरविंद केजरीवाल यांचे सल्लागार व्ही. के. जैन यांनी दिली आहे. या वक्तव्यामुळे आपच्या आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी ही माहिती गुरुवारी कोर्टात दिली. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आपचे आमदार प्रकाश जारवाल आणि अमानतुल्ला खान यांनी अंशू प्रकाश यांना घेराव घालून त्यांना मारहाण करण्यात आल्याचे कथित प्रकरण समोर आले होते. मात्र आता या प्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे.

सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी मॅजिस्ट्रेट शेफाली बरनाला टंडन यांना या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान मुख्य सचिव अंशूप्रकाश यांनी आपच्या दोन्ही आमदारांविरोधात मारहाण प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या आधी व्ही. के. जैन यांनी आपल्याला या मारहाण प्रकरणात काहीही ठाऊक नाही असे म्हणत कानावर हात ठेवले होते. तसेच जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा मी स्वच्छतागृहात गेलो होतो अशी माहिती त्यानी सोमवारी झालेल्या घटनेनंतर दिली होती. आता मात्र त्यांनी केजरीवालांसमोरच अंशू प्रकाश यांना मारहाण झाली असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवारी कोर्टाने जारवाल आणि खान या दोन्ही आमदारांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडले आहे. सोमवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना फोन करुन अरविंद केजरीवाल यांच्या घरी बोलावण्यात आले होते असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही आमदारांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी अंशू प्रकाश यांचे वकिल राजीव मोहन यांनीही केली. तसेच अंशू प्रकाश यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आला असाही आरोप करण्यात आला आहे.