इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावर लावलेल्या आरोपांची चौकशी करावी, या मागणीसाठी करण्यात आलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. रॉबर्ट वद्रा यांनी जमीन विक्रीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. आयएसीचे उत्तर प्रदेशमधील नेते नूतन ठाकूर यांनी गेल्यावर्षी नऊ ऑक्टोबरला यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौमधील खंडपीठाने याचिका फेटाळली. हा विषय केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ व्यक्तीच्या नातेवाईकाशी संबंधित असल्याने केवळ पंतप्रधान कार्यालयाच त्याची चौकशी करू शकेल, असा युक्तिवाद ठाकूर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. गेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारची बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मोहन पराशरण यांनी ही याचिका केवळ वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे करण्यात आली आहे. त्यात पुरेसे तथ्य नाही, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर आपला निर्णय राखून ठेवला होता.