येत्या आठवड्यात होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षातर्फे (आप) शनिवारी ७० कलमी निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. येणाऱ्या काळात दिल्लीचा सर्वसमावेशक विकास करण्याबरोबरच दिल्लीला जागतिक शहराचा दर्जा प्राप्त करून देण्याच्या मुद्द्याला या जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आप दिल्लीमध्ये पारदर्शक, जनतेचा सहभाग आणि जनतेशी संवाद असलेले सरकार स्थापन करेल, असे आश्वासन दिले. ‘आप’ने पुढील पाच वर्षांसाठी सादर केलेल्या या विकास आराखड्यात अनेक घोषणांची खैरात करण्यात आली आहे. ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यामध्ये गेल्यावेळी आम आदमी पार्टीने केलेल्या घोषणांचाच उल्लेख असल्याचे दिसत आहे. महिलांची सुरक्षा, दिल्लीत सीसीटीव्ही बसवणे, महागाई, रोजगार इत्यादी मुद्दे या जाहिरनाम्याच्या माध्यमातून दिल्लीकरांसमोर ठेवले आहेत.

दिल्लीकरांसाठी आम आदमी पक्षाची आश्वासने-
* सौरऊर्जेचा वापर करण्यावर अधिक भर देणार
* भाजपने कुठलीच आश्वासनं पूर्ण केली नाहीत
* दिल्लीला औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटन केंद्र बनवणार
* संपूर्ण दिल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
* विकासाच्या दृष्टीने व्यापाऱ्यांना सन्मान देणार
* जनलोकपाल विधेयक मंजूर करुन भ्रष्टाचाराला आळा घालणार
* रिक्षावाल्यांची समस्या दूर करणार, नवीन स्टँड उभारणार
* वकिलांसाठी आरोग्य आणि गृहनिर्माण योजना सुरु करणार
* वीज कंपन्यांचे ऑडिट करणार
* २४ तास वीज उपलब्ध करणार, विजेचे दर निम्म्याहून कमी करणार
* दिल्लीत २० नवी महाविद्यालये सुरु करणार, विविध अभ्यासक्रम सुरु करणार
* खासगी शाळांमध्ये फीद्वारे होणारी लूट थांबवणार, पारदर्शकता आणणार
* दिल्लीला देशातील रोजगार केंद्र बनवणार
* महिला सुरक्षेसाठी खास उपाययोजना करणार
* जलदगती न्यायालयांची निर्मिती करणार