राजस्थानच्या एका शेतकऱ्याने ‘आप’च्या जाहीर सभेत आत्महत्या केल्यानंतरही आपण भाषण सुरूच ठेवून चूक केली, असे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पश्चातबुद्धीने क्षमायाचना केली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी मात्र त्यांची क्षमायाचना नाकारली असून, या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेस व भाजपने केजरीवाल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
मी बोलणे सुरू ठेवायला नको होते. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी क्षमा मागू इच्छितो, असे या मुद्दय़ावर टीकेचा भडिमार सोसणारे केजरीवाल म्हणाले. मी अपराधी आहे व त्याबद्दल मला दोष द्या, परंतु यावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष द्या. जो कुणी दोषी असेल त्याला फासावर चढवा, परंतु शेतकरी आत्महत्या का करत आहेत यावर चर्चेचा रोख असायला हवा, असे केजरीवाल यांनी एका दूरचित्रवाहिनीला सांगितले.
तथापि, झाडावर चढून गळफास लावून घेणाऱ्या गजेंद्र सिंग या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केजरीवालांची क्षमायाचना मान्य करण्यास नकार दिला. ‘आता माफी मागून काय होणार आहे? माझा भाऊ तर गेला. या घटनेनंतर केजरीवालांनी दोन मिनिटांसाठीही सभा थांबवली नाही,’ असे गजेंद्रची बहीण रेखा हिने दौसा जिल्ह्य़ातील नांगल झामरवाडा या त्यांच्या गावी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या भावाच्या दुर्दैवी मृत्यूमागे कट असावा, त्याला कुणीतरी चिथावणी दिली असावी, असे ती म्हणाली.गावचे सरपंच आणि गजेंद्रचे काका गोपाल सिंग यांनी मात्र, आम्हाला या प्रकाराबाबत शंका असल्याचे सांगून कथित आत्महत्येची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली.  

चौकशीस सुरूवात
गजेंद्र सिंह या शेतक ऱ्याने सर्वासमक्ष झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्या घटनेची चौकशी नवी दिल्लीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. पण त्यात दिल्ली पोलिसांची भूमिका विचारात घेतली जाणार नाही. पुराव्यासाठी लोकांनी दिलेली माहिती विचारात घेतली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे व माहिती द्यावी, हा जिल्हा दंडाधिकारी संजयकुमार यांनी दिलेला आदेश पोलीस खात्याने धुडकावला आहे.

काँग्रेस, भाजपची टीका
केजरीवाल यांनी माफी मागणे पुरेसे नसून, अशी परिस्थिती का उद्भवू देण्यात आली याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी सांगितले.  मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रकारे तीन दिवस माध्यमांपासून दूर राहून, दु:खद घटनेबाबत बोलणे टाळले त्यावरून प्रश्न उपस्थित होतो, अशी टीका दिल्ली भाजप अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केली.