आपली जादू अजूनही संपली नसल्याचे दाखवून देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बवाना विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सोमवारी भाजपला चांगलीच धूळ चारली. तब्बल २४ हजार मतांनी भाजपचा पराभव केला. प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये आश्चर्यकारक आघाडी घेतलेल्या काँग्रेसला शेवटी तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले.

आम आदमी पक्षाचे रामचंदर यांना ५९ हजार ८८६, भाजपचे वेद प्रकाश यांना ३५ हजार ८३४ आणि काँग्रेसच्या सुरेंद्रकुमारांना ३१ हजार ९१९ मते मिळाली. २०१५मध्ये आम आदमीच्या तिकिटावर निवडून आलेल्या वेद प्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक घ्यावी लागली होती. पक्षातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेत भाजपने वेद प्रकाश यांना उमेदवारी दिली, पण त्यांचा पक्षबदलूपणा बवानाच्या मतदारांनाही पटला नाही. दिल्ली विधानसभेत शून्य अस्तित्व असलेल्या काँग्रेसला पहिल्या अकरा फेऱ्यांपर्यंत मताधिक्य होते. मात्र, त्यानंतर सुरेंद्रकुमार मागे पडत गेले आणि थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकण्याच्या नामुष्कीपासून भाजप बचावला.

बवानातील हा विजय लागोपाठ तीन पराभवाचे तोंड पाहिलेल्या केजरीवालांसाठी सुखद आश्चर्याचा धक्का ठरला. विशेषत: २४ हजारांचे घसघशीत मताधिक्य. जिथे विजयाची पूर्ण खात्री नव्हती, तिथे एवढय़ा मोठय़ा फरकाने यश मिळाले.

पहिल्यांदा पंजाब व गोव्यामध्ये अनपेक्षित हार, नंतर राजौरी गार्डनच्या पोटनिवडणुकीत पराभव आणि नंतर दिल्लीतील तीनही महापालिकांमध्ये भाजपने अक्षरश: धूळ चारल्याने केजरीवाल हादरले होते. त्यातच मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या कपिल मिश्रांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या सर्वामुळे केजरीवाल चोहोबाजूंनी अडचणीत आल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र त्यांनी रणनीती बदलली. एरवी भाजपवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आग ओकणारी केजरीवालांची तोफ एकदम थंडावली.

राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पुन्हा एकदा दिल्लीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. ऊठसूट मोदींना लक्ष्य करण्याचे आणि नायब राज्यपालांशी दररोज पंगा घेण्याचे जाणीवपूर्वक टाळले. या पाश्र्वभूमीवर मिळालेल्या विजयाने केजरीवालांना मोठे बळ मिळाले आहे आणि खचलेल्या कार्यकर्त्यांना मोठा हुरूप चढणार आहे.

बवाना हा वायव्य दिल्लीतील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. मूलत: ग्रामीण चेहरा आणि प्रामुख्याने झोपडपट्टय़ा असणारा शहरी भाग अशी या मतदारसंघाची रचना आहे.