दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदी सरकार लष्करविरोधी असल्याचे म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर शरसंधान साधले आहे. १९८४ मधील दंगलींचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला मुदतवाढ दिल्याच्या निर्णयावरुनही केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली आहे.

‘वन रँक वन पेन्शनबद्दलची सरकारची भूमिका, अपंगत्व आलेल्या जवानांना दिल्या जाणाऱ्या जवानांच्या निवृत्ती वेतनातील कपात, यातून मोदी सरकार लष्करविरोधी वाटत नाही का ? त्यांच्याकडून फक्त लष्करातील जवानांच्या त्यागाचा राजकारणासाठी वापर केला जातो,’ असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

भारतीय जवानांना युद्ध किंवा कारवाईच्या वेळी अपंगत्व आल्यास त्यांना मिळत असलेल्या पगाराइतकीच रक्कम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाते. मात्र आता सरकारने स्लॅब सिस्टिम आणल्याने जवानांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज अनेक तज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे. यानंतर संरक्षण मंत्रालयाने सातव्या वेतन आयोगाच्या समितीला जुनीच यंत्रणा पुढे सुरू ठेवण्याची सूचना केली आहे.

आणखी एका ट्विटमधून अरविंद केजरीवाल यांनी १९८४ मध्ये झालेल्या दंगलीच्या तपासाचा मुद्दा उपस्थित केला आहे. १९८४च्या दंगलीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला केंद्र सरकारकडून तपासासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यावरुन केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘मुदतवाढीनंतर मुदतवाढ दिली जात आहे. आतापर्यंत काहीही निष्कर्ष निघालेला नाही. न्याय देण्याचा कोणताही हेतू दिसत नाही. १९८४ च्या दंगलीतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे’, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

गृह मंत्रालयाने १९८४ च्या दंगल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला फेब्रुवारी २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. या पथकाची स्थापना फेब्रुवारी २०१५ मध्ये करण्यात आली होती. या पथकाला तपासासाठी सुरुवातीला सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र नंतर या पथकाला दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली, अशा वृत्ताचा उल्लेख केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला आहे.