दिल्ली विधानसभेच्या येत्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसकडून ‘लाच’ घ्या, परंतु मतदान मात्र ‘आप’लाच करा, असे दिल्लीच्या मतदारांना आवाहन करून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनेक वर्षांपासून लोकांची फसवणूक करत आहेत. तुम्ही त्यांच्याकडून लाचेची रक्कम घेतल्यानंतर आमच्या पक्षाला मतदान करा आणि त्यांना फसवा, असे केजरीवाल म्हणाले. हा निवडणुकीचा काळ आहे. भाजप आणि काँग्रेसचे लोक तुम्हाला पैशांचे आमिष दाखवतील, हा पैसा नाकारू नका.. तो घ्या. काहीजणांनी टू-जी घोटाळ्यातून, तर काहींनी कोळसा घोटाळ्यातून लुटलेला हा पैसा आहे आणि या पक्षांचे कार्यकर्ते तुमच्याकडे आले नाहीत तर त्यांच्या कार्यालयात जा.. आम्ही तुमची वाट पाहत होतो, पण तुम्ही आला नाहीत, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्या, असे केजरीवाल यांनी सांगितले.
या दोन्ही पक्षांकडून पैसे घ्या, पण ‘आप’ला मत द्या. आपण या वेळी त्यांना मूर्ख बनवू. हे लोक गेल्या ६५ वर्षांपासून आपल्याला मूर्ख बनवत आहेत, आता आपली पाळी  आहे, असे उत्तमनगर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार नरेश बालयान यांच्या प्रचारासाठी दक्षिण दिल्लीतील नवाडा भागात घेतलेल्या सभेत केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, या वादग्रस्त विधानाबद्दल केजरीवाल यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे दाद मागता येईल काय, या संदर्भात पक्ष सल्ला घेईल, काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकारांना सांगितले.
बिन्नी भाजपमध्ये
आम आदमी पक्षाचे माजी आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आपच्या माजी नेत्या शाझिया इल्मी तसेच अण्णा हजारे यांच्या सहकारी किरण बेदी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ बिन्नी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपवर टीका केल्या प्रकरणी बिन्नी यांना पक्षाने निलंबित केले होते. २०१३ च्या निवडणुकीत  लक्ष्मीनगर भागातून ते निवडून आले होते.