भ्रष्टाचार रोखण्याच्या नावाखाली मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा एका मोठ्या घोटाळ्याचा भाग असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते शनिवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सरकारच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घोषित करण्यापूर्वीच काळा पैसा असलेल्या आपल्या सर्व मित्रांना सावध केले होते. त्यामुळे या सर्वांनी निर्णय घोषित होण्यापूर्वीच आपापल्या काळ्या पैशाची योग्य व्यवस्था लावली, असा आरोप केजरीवाल यांनी केला. त्यामुळे हा काळ्या पैशावरील नव्हे तर सामान्य जनतेच्या बचतीवरील ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले. मुद्दाम चलनाची टंचाई निर्माण केली जात आहे. ज्यामुळे नागरिक सरकारच्या दलालांकडे जाईल. या निर्णयामागे असलेला सरकारचा हेतू चुकीचा आहे, त्यामुळेच आम्ही याबद्दल सवाल उपस्थित करत आहोत. सरकारने ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांवरील बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेतला पाहिजे, अशी ठाम मागणीही यावेळी केजरीवाल यांनी केली.

अचानकपणे नोटा रद्द करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल थांबविण्यात आले नाही, तर चिडलेली जनता निवडणुकीत ‘लक्ष्यभेद’ करून धडा शिकवेल आणि सरकारला ते भारी पडेल, असा खणखणीत इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. जनतेला रस्त्यावर आणून ते जपानला गेले असल्याची टीका करीत ठाकरे यांनी नोटा बदलण्यास विरोध नसून त्याची मुदत वाढविण्याची मागणी केली.

पंतप्रधान मोदी यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा अचानकपणे रद्द केल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत असल्याचे सांगून ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयावर शुक्रवारी पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले. हिंमत असेल तर ५६ इंचाची छाती ५६०० इंच करून स्विस बँकेवर ‘लक्ष्यभेद’ करा आणि काळा पैसा भारतात आणून दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. काळा पैसा बाहेर काढण्याबाबत कोणतेच दुमत नाही. मात्र त्यासाठी अचानकपणे नोटा रद्द केल्याने जनतेचे हाल होत आहेत. लग्न रद्द होत आहेत, रुग्णालयात अडचणी येत आहेत. सर्वसामान्य जनतेने निवडून दिले आहे, हे विसरून जनतेचे हाल करण्यात येत आहेत. मोदी यांनी जनतेच्या विश्वासाशी प्रतारणा केली असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मुलुंड येथे एका वृद्धाचा नोटा बदलण्यासाठी रांगेत झालेल्या मृत्यूलाही ज्यांनी (मोदी) नोटा बदलण्याचा निर्णय जाहीर केला तेच जबाबदार असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.