आगामी २०१४ मधील लोकसभा निवडणूक ही आम आदमी पक्ष विरुद्ध रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यात होणार का? आणि राहुल गांधी तसेच नरेंद्र मोदी हे अंबानींचे एजंट म्हणून काम करणार का, असा खोचक सवाल करून गॅस दराच्या मुद्दय़ावर ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रविवारी कॉंग्रेस आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे.
गॅसच्या किमती वाढण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून कॉंग्रेस आणि भाजपचे मुकेश अंबानी आणि अदानी या कंपनीशी काय संबंध आहेत, अशी विचारणा केली. गॅस दराच्या मुद्दय़ावरून केजरीवाल यांनी ट्विटरवरून कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नरेंद्र मोदींनी गॅस दरप्रकरणी आपले मौन सोडून त्यांच्या पक्षाचे अंबानी आणि अदानीसोबत काय संबंध आहेत ते स्पष्ट करावे, असे केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तसेच गॅस दर वाढवून देण्यासाठी राहुल गांधी अंबानींना का मदत करत आहेत, कॉंग्रेस हे अंबानींचे दुकान आहे का, अशी टीकाही केजरीवाल यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष गॅसचे दर हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे ट्विटही केजरीवाल यांनी केले.