दिल्लीतील महानगरपालिका निवडणुका आणि देशातील अन्य भागातील पोटनिवडणुकांसाठी भाजपने उत्तर प्रदेशमधीलच ईव्हीएम मशिन्स वापरण्याचा घाट घातला आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत हे आरोप केले. यावेळी केजरीवाल यांनी म्हटले की, भारतात खूप मतदान यंत्र (ईव्हीएम) आहेत. मग उत्तर प्रदेशातूनच मतदान यंत्रे का आणली जात आहेत? उत्तर प्रदेशच्या गोविंद नगरमधून मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांसाठी ३०० ईव्हीएम मशिन्स आणण्यात आल्या आहेत. मात्र, नियमानुसार निवडणुकांच्या निकालानंतर संबंधित ईव्हीएम मशिन्स ४५ दिवसांपर्यंत वापरता किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाहीत. मग आता निवडणूक आयोगाच्या या बंधनाचे काय झाले, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.

यावेळी केजरीवाल यांनी नुकत्याच मध्य प्रदेश सरकारकडून घेण्यात आलेल्या व्हीव्हीपीएटी मशिन्सच्या चाचणीकडेही लक्ष वेधले. या चाचणीत मशिनमध्ये नोंदविण्यात आलेले प्रत्येक मत हे भाजपला देण्यात आलेल्या मताचा पुरावा आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून चौकशी करून तीन अधिकाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. सगळ्याच ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार केल्याचे दिसत नाही. मात्र, काही परिसरात असा प्रकार घडला आहे. मी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे हा प्रस्ताव मांडला असून तुमच्याकडे सॉफ्टवेअर तज्ज्ञ नसतील तर आम्ही ते उपलब्ध करून देऊ, असे पत्रात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. यावरून उत्तर प्रदेशमधील ईव्हीएम मशिन्सचा घोटाळा किती मोठा असू शकतो याची कल्पना करा, असेही केजरीवाल यांनी म्हटले.