दिल्ली मनपा निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये घोळ होईल अशी आपणास भीती वाटते असे वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.  दिल्लीतील किमान ५ ते १० टक्के ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होऊ शकतो असे त्यांनी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. दिल्लीमध्ये मनपा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक केजरीवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. आपण केलेल्या कामावर आपण निवडून येणार असा विश्वास त्यांना वाटतो. परंतु ईव्हीएममध्ये घोळ करुन आपचे काही उमेदवार पाडले जाऊ शकतात असे ते म्हणाले. २००६ साली बनविण्यात आलेले ईव्हीएम मशीन्स या निवडणुकीत वापरण्यात येणार आहे.

या मशीनला व्हीव्हीपीएट मशीन देखील जोडले जाणार नाही त्यामुळे मतदान कुणाला पडले याची मतदाराला खात्री कशी होईल असा सवाल त्यांनी केला. पंजाबमध्ये पराभव झाल्यानंतर ईव्हीएम मध्ये असलेल्या घोळामुळेच आपण हरल्याचे त्यांनी म्हटले होते. तुमच्या पराभवाचे आत्मपरीक्षण करा आमच्यावर खापर फोडू नका असे केजरीवालांना निवडणूक आयोगाने खडसावले होते. ईव्हीएम मध्ये घोळ करता येत नाही असे निवडणूक आयोगाने वेळोवेळी म्हटले. तुमच्या शंकांचे निरसन होत नसेल तर आम्ही तुम्हाला आव्हान देतो, ईव्हीएममध्ये घोळ करुन दाखवा असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.  मे महिन्यामध्ये ही चाचणी होणार असून ईव्हीएममध्ये घोळ करुन दाखवा असे आव्हान आयोगाने सर्वांना दिले आहे. हे आव्हान फसवे आहे असे देखील केजरीवालांनी म्हटले. निवडणूक आयोगाने याची कोणतीही तारिख जाहीर केली नसल्याचे त्यांनी म्हटले.

आयोगाने केवळ बातम्या पसरवल्याचा आरोप केजरीवालांनी केला. याआधी, ईव्हीएममध्ये घोटाळा करता येतो असे केजरीवाल यांनी म्हटले होते. मी आयआयआटीमध्ये शिकलो आहे, ईव्हीएममध्ये घोळ करण्याचे १० मार्ग मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो असे त्यांनी म्हटले होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांचे नाव न घेता टीका केली होती. दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच ईव्हीएममध्ये घोळ आहे अशी ओरड विरोधी पक्षातील नेते करत आहेत असे ते म्हणाले होते. विरोधी पक्ष प्रत्येक वेळी एक नवा मुद्दा शोधून काढतात आणि त्याद्वारे सर्वांचे लक्ष विचलित करू पाहतात असे ते म्हणाले होते.