अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अवमानकारक खटल्यासंदर्भात गुरुवारी शहर न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आपच्या इतर पाच नेत्यांना जामीन मंजूर केला आहे. वीस हजार रुपयांचा जातमुचलका व तितक्याच रकमेची हमी घेण्यात आली आहे.
मुख्य न्यायदंडाधिकारी सुमित दास यांनी आपचे नेते आशुतोष, संजय सिंह, कुमार विश्वास, राघव चढ्ढा व दीपक वाजपेयी यांना जामीन मंजूर केला. सुनावणीस सुरुवात होण्यापूर्वी न्यायालय परिसरात आप व भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. याबाबतची पुढील सुनावणी १९ मे रोजी होणार आहे.