पक्षातील लोकशाही आणि अरविंद केजरीवाल यांच्या संघटन कौशल्याबाबत आम आदमी पक्षाचे मार्गदर्शक शांती भूषण यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. अरविंद केजरीवाल चांगले नेते आणि प्रचारक आहेत, मात्र त्यांच्याकडे संघटन कौशल्याचा अभाव आहे. देशभर पक्षाचा विस्तार करता येईल अशा स्वरूपाची क्षमता त्यांच्यात नाही, असे मत शांती भूषण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षात कार्यकर्ते आणि नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू  आहेत. त्यामुळे शांती भूषण यांचे हे मत महत्त्वपूर्ण आहे. पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप करत गायक करन सिंह यांनी आप कार्यकर्ता विचार मंचची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भूषण यांनी या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला. केजरीवाल हे निवडून आलेले नेते नाहीत, त्यामुळे एकमुखी नेता असल्याचा दावा त्यांना करता येणार नाही, असे भूषण यांनी स्पष्ट केले.