दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च रक्तदाब आणि खोकल्याचा त्रास वाढल्याने उपचारासाठी ते बेंगलुरूतील निसर्गोपचार संस्थेत दाखल झाले आहेत. त्याठिकाणी ते जिंदल निगर्सोपचार संस्थेत दहा दिवस मुक्काम करतील. केजरीवाल यांच्यासोबत त्यांचे आईवडीलही विमानतळावर उतरले. तेथून ते सरळ तुमकुरू मार्गावरील जिंदल संस्थेत पोहोचले. त्यांच्यावर उपचार करण्याची पूर्वतयारी झाली असून त्यांच्यावर वरिष्ठ डॉ. बबीना नंदकुमार उपचार करणार आहेत. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री केजरीवाल याठिकाणी चौकशी करून गेले. तेव्हा त्यांना खोकल्याचा त्रास नव्हता तर मधुमेहावरील उपचारासाठी ते आले होते. यावेळी मधुमेह आणि वाढता खोकला या दोन्हीवर उपचार करण्यात येतील. खोकल्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांना पुढेही पाठपुरावा करावा लागेल. निसर्गोपचार ही औधषाविना केली जाणारी उपचार पद्धत आहे. विष साठत गेल्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे निर्विषीकरणाबरोबरच जलनित्सारण ही निसर्गोपचारातील उपचार अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात येतील, असे डॉ. नंदकुमार म्हणाल्या. केजरीवाल २०१२मध्येही याच संस्थेत दाखल झाले होते. तेव्हाही त्यांनी १० दिवस उपचार घेतले तेही आंदोलन शिरोमणी अण्णा हजारे यांच्यासोबत. अण्णांनादेखील त्यावेळी उच्च रक्तदाबाची त्रास होता. काही आठवडय़ांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना बेंगलुरू येथील उपचाराबद्दल विचारले होते.
एकीकडे केजरीवाल यांना शारिरीक त्रासाचा सामना करीत असतानाच दुसरीकडे ‘आप’ पक्षात अंतर्गत कलह वाढले आहेत. म्हणूनच बुधवारी केजरीवाल यांनी दिल्लीतील बैठकीतून काढता पाय घेतला. तेथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने संस्थापक सदस्य योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना काढून टाकण्याची मागणी करीत मतदान केले होते.
या पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांच्या परोक्ष दिल्लीचा कारभार त्यांचे निकटवर्तीय व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सांभाळणार आहेत.