‘वरिष्ठांवरील कारवाईचा धसका
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयात काम करण्यास जवळपास १२ ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दिल्लीबाहेरून अधिकारी आणावे लागणार आहेत अथवा खासगी व्यक्तींची नियुक्ती करावी लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सध्या अधिकाऱ्यांची वानवा आहे आणि सूत्रांनी दिलेली माहिती खरी असल्याचे गृहीत धरल्यास केजरीवाल यांचे कार्यालय लवकरच अधिकारीविहीन होणार आहे.
केजरीवाल यांनी आपल्या कार्यालयात काम करण्यासाठी आतापर्यंत १०-१२ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र या सर्वानी त्याला नकार दिला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार आणि उपसचिव तरुणकुमार यांच्यावर लाचप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे आपणही गोत्यात येऊ अशी भीती अधिकाऱ्यांना वाटत आहे, असे सूत्रांनी सांगितले. राजेंद्रकुमार आणि तरुणकुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सध्या ही स्थिती असल्याने केजरीवाल यांना दिल्लीबाहेरून अधिकारी नियुक्त करावे लागणार आहेत अथवा कारभार चालविण्यासाठी खासगी व्यक्तींची नियुक्ती करावी लागणार आहे. सरकारच्या सर्व कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असल्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तातडीने अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2017 1:43 am