दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी आम आदमी पार्टीच्या (आप) पारडय़ात भरघोस मते टाकून विश्वास दर्शविला असला तरी पक्षांतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचेच स्पष्ट  संकेत मिळू लागले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या निमंत्रकपदावरून हटविण्याच्या हालचाली ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी सुरू केल्याचा आरोप होऊ लागल्याने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत या दोघांविरुद्ध पक्षादेश जारी करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी एका मुलाखतीत, केजरीवाल यांच्याऐवजी यादव यांना निमंत्रक करण्याचे वक्तव्य केले होते. त्यावर सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आपचे नेते संजयसिंह यांनी प्रशांत भूषण यांच्यावर टीका केली. पक्षातीलच काही ज्येष्ठ  नेते पक्षाची प्रतिमा मलिन करून आणि केजरीवाल यांना लक्ष्य करून त्यांना राष्ट्रीय निमंत्रकपदावरून हटविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे संजयसिंह म्हणाले.
याबाबत नेत्यांनी केलेली निवेदने आणि पाठविलेली पत्रे यांचा संदर्भ देण्यात आला. यामुळे पक्षाचे हसे झाले आहे, असे ते म्हणाले. पत्र फुटल्याची दखल घेत पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचे सदस्य म्हणाले की, माध्यमांद्वारे ही बाब चव्हाटय़ावर आणण्याऐवजी त्यामध्ये पक्षात चर्चा करणे उचित ठरले असते.

‘आप’मध्ये वाद ही काल्पनिक बाब -यादव
‘आप’मध्ये सध्या जोरदार अंतर्गत वाद उफाळून आला असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी सोमवारी केला. ‘आप’मधील घडामोडींबाबत सध्या जी चर्चा सुरू आहे ती काल्पनिक असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.दिल्लीकरांनी पक्षावर मोठा विश्वास टाकून निवडणुकीत भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या क्षुल्लक गोष्टींमध्ये कोणीही अडकू नये. गेल्या चार दिवसांपासून आपल्याबद्दल आणि प्रशांत भूषण यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. नव्या अफवा पसरविल्या जात असून हे कारस्थान आहे, असे यादव म्हणाले.