दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सहकार्याची याचना केली. आपल्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी, केंद्राने दिल्ली सरकारला सहकार्य केले पाहिजे, असे त्यांनी मोदींना सांगितले. यावेळी केजरीवाल आणि मोदी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे राज्यपाल नजीब जंग यांच्याशी सुरू असलेल्या वादाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. दिल्लीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम करण्याची गरज आहे. मात्र, दोघांच्या भिन्न राजकीय विचारधारेमुळे या सगळ्यात अडथळा निर्माण होता कामा नये, असे केजरीवालांनी मोदींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. आम्ही तुमचे ‘स्वच्छ भारत’ आणि ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारायला मदत करू. आपण काम करूया आणि त्यानंतर तुम्ही परदेशात जाऊन प्रसिद्धी कमवा. आपण हे सगळे काही करू फक्त आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे आपण चर्चेदरम्यान मोदींना म्हटल्याचे केजरीवालांनी सांगितले.
यावेळी आपण त्यांच्यासमोर अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केल्याचेही केजरीवाल म्हणाले. तुम्ही (मोदी) गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना राज्यपालांनी कितीवेळा राज्य सरकारचे आदेश रद्द केले होते, असा सवाल केजरीवालांनी चर्चेदरम्यान मोदींसमोर उपस्थित केला. त्यावेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तरीसुद्धा गुजरात सरकारच्याबाबतीत असा प्रकार झाल्याचे एकदेखील उदाहरण सापडणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. याशिवाय, दिल्ली पोलीस आमच्या सरकारविरुद्ध युद्ध छेडल्यासारखे वागत असल्याचा मुद्दाही आपण मोदींसमोर यावेळी मांडला. पोलीसांकडून आमच्या आमदारांना एकामागोमाग अटक करण्यात येत आहे. पोलिसांकडूनच असे वर्तन होत असेल तर राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल आणि ही सगळी परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे आपण मोदींच्या निदर्शनास आणून दिल्याचे केजरीवालांनी सांगितले.