हजारो समर्थकांच्या गराडय़ात दिल्लीच्या मतियाला विधानसभा मतदारसंघात गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रोड-शो आयोजित केला होता. पिवळ्या रंगाच्या खुल्या जीपमधून अरुंद गल्ल्यांमधून वाट काढत केजरीवाल यांनी जनतेशी हस्तांदोलन करीत रोड-शो केला. मतियालाचे आमदार गुलाबसिंह यादव हेही केजरीवाल यांच्यासमवेत होते.

सरकारच्या विविध घोषणांचे फलक हातात घेऊन आपच्या समर्थकांनी ‘लगे रहो केजरीवाल’ या गाण्यावर नृत्य केले. दिल्लीमध्ये आपसारख्या पक्षाचा पर्याय आहे याचा आम्हाला आनंद वाटतो, अन्यथा आम्हाला भाजप किंवा काँग्रेसलाच मतदान करावे लागले असते, अशा प्रतिक्रिया या वेळी ऐकावयास मिळत होत्या.

‘रिंकिया के पापा’मुळे ‘आप’कडून पूर्वाचलमधील नागरिकांचा अपमान

भाजपप्रमुख मनोज तिवारी यांचा आरोप

नवी दिल्ली :  ‘रिंकिया के पापा’ या गाण्याची खिल्ली उडवून आप आणि त्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल पूर्वाचलमधील नागरिक आणि त्यांच्या संस्कृतीचा अपमान करीत असल्याचे दिल्ली भाजपप्रमुख मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि बिहारचा काही भाग येथील नागरिक दिल्लीत वास्तव्याला आहेत. केजरीवाल सरकारने पाणी आणि मोफत वीज याबाबत केलेल्या घोषणांचा या नागरिकांवर प्रभाव पडलेला नाही. त्यांच्यापैकी ९८ टक्के नागरिक भाजपचे समर्थक आहेत, असे तिवारी यांनी म्हटले आहे. पूर्वाचलमधील नागरिकांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा आहे, कारण केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने हे नागरिक आणि त्यांच्या संस्कृतीचा अनेकदा अपमान केला आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे. गाण्यातील रिंकियाचा संदर्भ कन्या असा आहे, त्याची खिल्ली उडवून आप आणि केजरीवाल हे कन्या आणि महिला यांच्या समाजातील भूमिकेचा अनादर करीत आहेत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.