दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला असल्याचा दावा केला आहे. महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत दिवसाला चार हजार रुग्ण आढळत होते. दिल्लीत आलेली करोनाची ही दुसरी लाट होती असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्याने करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केल्याचा दावा केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी माहिती दिली.

अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, “तज्ञांच्या म्हणण्यानुसार दिल्लीत करोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे”. करोना रुग्णसंख्येत दिल्ली सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीत २ लाख ५६ हजार ७८९ करोना रुग्ण आहेत. दिल्लीत ९ सप्टेंबरला पहिल्यांदा दिवसाला चार हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले होते. त्यादिवशी २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

आणखी वाचा- करोना हरतोय, भारत जिंकतोय… सलग पाचव्या दिवशी करोनामुक्त झालेल्यांची संख्या करोनाबाधितांपेक्षा अधिक

“दिल्लीत १६ सप्टेंबर रोजी करोनाचे ४५०० रुग्ण आढळले होते. यानंतर रुग्णसंख्या कम होऊ लागली. नंतर ही संख्या ३७०० वर आली. येणाऱ्या दिवसांमध्ये रुग्णसंख्या अजून कमी होत जाईल,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- देशातील मृतांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर; २४ तासांत १,१२९ जणांचा मृत्यू

१६ सप्टेंबरला सर्वाधिक ४४७३ रुग्णांची नोंद झाली होती. राजधानीत करोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही दिवसातील सर्वाधिक संख्या होती. मार्च महिन्यात दिल्लीत पहिला करोना रुग्ण आढळला होता. यानंतर तेथील रुग्णसंख्या वाढतच आहे. जुलै महिन्यात रुग्णसंख्या कमी झालेली पहायला मिळाली होती. जुलै महिन्यात दिवसाला १००० ते १५०० रुग्ण आढळत होते.