‘दिल्लीतील जनतेला पुन्हा निवडणुकीला तोंड द्यावे लागू नये’ या ‘हेतू’ने आम आदमी पक्षाला सत्तास्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देऊ करणाऱ्या काँग्रेस आणि भाजपसमोर ‘आम आदमी’ने शनिवारी १८ अटी ठेवल्या. या अठरा मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट करा, मग आम्ही तुमचा पाठिंबा घेऊ, असे अरविंद केजरीवाल यांनी या पक्षांच्या प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटले. मात्र, या मुद्यांवर काँग्रेस किंवा भाजप मान्य होण्याची शक्यता नसल्याने दिल्लीवर राष्ट्रपती राजवटीचे सावट कायम आहे.
दिल्लीत सत्तास्थापनेच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे शनिवारी दहा दिवसांची मुदत मागितली. काँग्रेस व भाजपने सत्तास्थापनेसाठी आम आदमी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच ठेवला आहे. त्यावर उभय पक्षांना १८ मुद्दय़ांवर भूमिका घोषित करा, असे आम आदमी पक्षाने ठणकावले. यासंबंधीचे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांना आम आदमी पक्षाने पाठवले. तत्पूर्वी, सकाळी साडेदहा वाजता केजरीवाल यांनी नजीब जंग यांची भेट घेतली. नजीब जंग यांनाही हे पत्र देण्यात आले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर विचार करण्याची विनंती जंग यांनी अरविंद केजरीवाल यांना केली. आम्हाला पाठिंबा देण्यामागे काँग्रेस, भाजपचा नक्की काहीतरी उद्देश असावा. मात्र सत्तास्थापनेवर आम्ही जनतेचे मत विचारात घेऊ. जनतेला निवडणूक वचननाम्यातून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने पाठिंबा द्यावा. तसे काँग्रेसने घोषित करावे, असे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांच्या महत्त्वाच्या अटी
*अतिमहत्त्वाची व्यक्ती वगैरे ही संकल्पना बाद ठरवावी.
*सर्व आमदार, मंत्री लाल दिव्याची गाडी नको. सरकारी बंगला अथवा सरकारी सेवेचा लाभ घेणार नाहीत.
*हजारे यांचे जनलोकपाल विधेयक मंजूर करावे.
*वीज कंपन्यांचे विशेष लेखापरिक्षण
*करारावर सरकारी सेवेत असलेल्यांना कायम करणे.
*एफडीआयला विरोध.
“आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. जो कोणी स्वच्छ प्रशासन देण्याची घोषणा करतो त्यांना आमचा पाठिंबा असेल. आमचा पाठिंबा नाकारला तर मग घटनात्मकदृष्टय़ा जे योग्य असेल ते होईल.”
सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री