बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनींना येणाऱ्या बलात्काराच्या धमक्यांच्या प्रकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपवाल्यांना बलात्काराशिवाय काही येते का, असे केजरीवाल म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे दिल्लीत भाजप-केजरीवाल यांच्यातील शाब्दिक संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

भाजपवर विविध मुद्द्यांवरून टीकेची झोड उठवणारे आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनींना बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. हाच मुद्दा उपस्थित करून त्यांनी ट्विटरद्वारे भाजपवर तोफ डागली आहे. भाजपवाल्यांना बलात्काराशिवाय काही येते का? भाजपला देश चालवता येत नाही. देशाची पूर्ण वाट लावली आहे. दररोज मुलींना बलात्काराची धमकी दिली जात आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दिल्ली विद्यापीठातील रामजस महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावरून अलिकडेच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आपण भाजपचे कार्यकर्ते नाही, तर देशाचे पंतप्रधान आहोत, हे मोदींना समजले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला होता. मोदी यांनी पंतप्रधानांसारखे काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले होते. तसेच पोलिसांवरही टीका केली होती. नागरिकांची सुरक्षा करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे. याउलट ते भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम करत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला होता. रामजस महाविद्यालयातील घटना दुर्दैवी आहे. दोषींविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती. आता बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थिनींना बलात्काराच्या धमक्या येत असल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. यामुळे भाजप-अरविंद केजरीवाल यांच्यातील शाब्दिक वाद पेटण्याची चिन्हे आहेत.