अरविंद केजरीवाल यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आदित्य बिर्ला समूहाकडून २५ कोटींची लाच घेतली, असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केला. निश्चलनीकरणाचा निर्णय हा ‘कडक चहा’ नव्हे तर ‘आम आदमी’साठी विषासारखा आहे, अशा शब्दांत केजरीवाल यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.

दिल्ली विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात बोलताना केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘उद्योगपती मित्रां’ना संरक्षण देत आहेत. हे उद्योगपती मोदींना पैसे पुरवतात. त्या बदल्यात प्राप्तिकर विभाग या उद्योगपतींच्या निवासस्थानावर छापे घालणार नाही, याची काळजी पंतप्रधान घेतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

१५ ऑक्टोबर २०१३ रोजी प्राप्तिकर विभागाने आदित्या बिर्ला समूहाचे तत्कालीन पदाधिकारी शुभेंदू अमिताभ यांच्या निवासस्थानावर छापे घातले होते. त्यांचा ब्लॅकबेरी फोन, लॅपटॉप आदींची तपासणी करण्यात आली. लॅपटॉपमध्ये १६ नोव्हेंबर २०१२ रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना २५ कोटींची लाच दिल्याची नोंद प्राप्तिकर विभागाला आढळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

काँग्रेसचे अभय?

प्राप्तिकर विभागाने याबाबत सादर केलेल्या अहवालासंदर्भात तत्कालीन काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे आले असताना तरी त्या वेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसने त्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी होती. मात्र तशी कारवाई न झाल्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यात ‘व्यवहार’ झाल्याचे म्हणायला हवे.