‘आम आदमी’च्या नवी दिल्लीत काल रात्री घडलेल्या दोन बलात्काराच्या घटनांचा निषेध करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकराणाबाबतीत हयगय बाळगल्याच्या कारणावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावले.
नवी दिल्लीत एका महिला डॅनिश पर्यटकावर सामूहिक बलात्कार आणि आणखी एका तरुणीवर अत्याचार झाल्याची ही दोन प्रकरणे काल रात्री नवी दिल्लीत घडली. या प्रकरणांची ‘आप’च्या नेत्यांनी सविस्तर माहिती घेतली. यात दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्यात दुर्लक्ष केल्याचे समोर आले असल्याचे दिल्लीचे विधीमंत्री सोमनाथ भारती यांनी म्हटले. याप्रकरणी राज्यपालांशी भेट घेऊन कारवाईत दुर्लक्ष करणाऱया अधिकाऱयांचे निलंबन आणि यापुढे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांकडून हयगय बाळगली गेल्यास कठोर कारवाई करण्याच्या मुद्दयावरून चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.
डोळ्यासमोर गुन्हा घडत असताना पोलीस हातावर हात धरून गप्प कसे काय बसू शकतात? महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची नाही का? असा सवाल दिल्ली पोलीस आयुक्तांना भेटून दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अखेरची तंबी देणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले. 
दुसऱया बाजूला ‘आप’ नेते विनोदकुमार बिन्नी यांनी पक्ष नेतृत्वारच टीका केल्याच्या मुद्दयावर केजरीवाल यांनी सध्यातरी मौन बाळगणेच पसंत केले आहे. तर, बिन्नी यांनी पक्ष शिस्तीचे भंग केल्याचे सांगत  बिन्नींवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे ‘आप’चे नेते योगेंद्र यादव यांनी याआधी सांगितले आहे.