अरविंदांची आरोळी : विधेयक मंजुरीसाठी कोणत्याही थराला जाऊ
जनलोकपाल विधेयक हा भ्रष्टाचारविरोधी कायदा मंजूर करून घेण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस आणि भाजपने या विधेयकाला विरोध दर्शविला आहे.
बोकाळलेला भ्रष्टाचार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ, असे ते म्हणाले. या प्रश्नावर आपण राजीनामा देणार का, असे विचारले असता केजरीवाल यांनी, भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर आपण कोणत्याही थराला जाऊ, असे उत्तर दिले. आपल्या वक्तव्यातून कोणता अर्थ ध्वनित होतो ते तुम्ही ठरवा, असेही ते म्हणाले.
या विधेयकाला काँग्रेस आणि भाजप कधीही मंजुरी देणार नाहीत, असे स्पष्ट करून केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे ठरविल्यापासून काँग्रेसच्या पायाखालील जमीन सरकली आहे. एमसीडीमध्ये गेल्या सात वर्षांपासून भाजपचे सरकार असून त्यांच्यावर आरोप होत आहेत, असे ते म्हणाले.
गेल्याच आठवडय़ात दिल्ली मंत्रिमंडळाने विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली़  त्यात सर्व सार्वजनिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून ते ड वर्गातील कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची कमाल शिक्षा ठोठाविण्याची तरतूद करण्यात आली आहे.