केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात आम आदमी पक्ष वा काँग्रेसला आंदोलनात सहभागी करण्यास विरोध असल्याचे ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी अण्णांची महाराष्ट्र सदनात भेट घेतल्यानंतर मंगळवारी केजरीवाल सहभागी होणार असल्याचे आम आदमी पार्टीच्या सूत्रांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी दोनदिवसीय आंदोलन आरंभिले आहे. आज दुपारी ३ वाजता केजरीवालही अण्णांसोबतर धरणं धरणार आहेत.
दरम्यान, या कायद्याच्या अध्यादेशात सुधारणा नव्हे तो मागे घेण्याची मागणी अण्णांनी केली आहे. अण्णा म्हणाले की, जमीन अधिग्रहण कायद्यातील जाचक अटी अध्यादेशाद्वारे सरकारने शेतकऱ्यांवर लादल्या आहेत. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. येत्या दोन दिवसांत सहकारी संघटनांशी चर्चा करून लवकरच ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली आहे.