राजकारणात धमाकेदार ‘एन्ट्री’च्या तयारीत असलेले अभिनेते कमल हसन यांची आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल भेट घेणार आहेत. केजरीवाल यांच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली. केजरीवाल आज सकाळी साडेअकराच्या सुमारास चेन्नईत पोहोचतील. या भेटीमागील कारणे त्यांनी उघड केली नाहीत. पण ही ‘राजकीय’ भेट असू शकते, असा अंदाज आहे. हसन राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे केजरीवाल-हसन यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. तसेच या भेटीच्या माध्यमातून केजरीवाल तामिळनाडूच्या राजकारणातील संधी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा आहे.

केजरीवाल यांचा हा दौरा अधिकृत असल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. एक दिवसीय दौऱ्यात ते चेन्नईतील जागतिक कौशल्य विकास केंद्राला भेट देणार आहेत. तसेच हसन यांची भेट घेणार असल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हसन हे केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. ते दोघे दुपारी एकत्र जेवण घेणार असून त्यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. हसन यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास त्यांना सहकारी पक्ष म्हणून ‘आप’ मदत करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे हसन यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेतली होती. दुसरीकडे केजरीवाल यांनाही देशाच्या दक्षिण भागात पक्षविस्तार करायचा आहे. त्यामुळे केजरीवाल आणि हसन यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.