29 October 2020

News Flash

दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल घेणार शपथ, रामलीला मैदानावर उद्या सोहळा

रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारुन ७० पैकी ६२ जागा आपने जिंकल्या. यानंतर अरविंद केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. त्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवार) दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर इतर सहा मंत्र्यांचाही शपथविधी त्यांच्यासोबत होणार आहे. या सहा मंत्र्यांमध्ये मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसेन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे. १६ फेब्रुवारी म्हणजेच उद्या रामलीला मैदानावर सकाळी १० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही ते स्पष्ट झालेलं नाही. आपच्या वतीने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दिल्लीतील खासदारांना आणि भाजपाच्या आठ आमदारांनाही शपथविधीसाठी बोलवण्यात आलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि आप म्हणजेच आम आदमी पार्टी यांच्यात मुख्य लढत होती. निवडणूक निकालापूर्वी आम्ही ५५ जागा जिंकू असा दावा भाजपाने केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६२ जागा जिंकत भाजपाचा पराभव केला. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपवर विश्वास टाकला हेच त्याचं प्रमुख कारण होतं. दिल्ली विधानसभेसाठी गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नव्हती. काँग्रेसची ती अवस्था या वेळीही झाली. दिल्लीत एकही जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं नाही.

दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर जोरदार तयारी सुरु आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे असंही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 8:45 am

Web Title: arvind kejriwal to take oath as delhi cm with 6 minisiters tomorrow at ramleela ground scj 81
Next Stories
1 ‘डायमंड प्रिन्सेस’ जहाजावरील तिसऱ्या भारतीयाला करोना संसर्ग 
2 चीनमध्ये ‘करोना’चे १,५०० बळी
3 ‘सीएए’विरोधी वक्तव्य: डॉ. काफील खान यांच्याविरुद्ध ‘रासुका’न्वये कारवाई
Just Now!
X