28 March 2020

News Flash

दिल्लीत सरकारी रुग्णालयांमध्ये व्हीआयपी संस्कृतीला लगाम; केजरीवाल सरकारचा निर्णय

यापुढे कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला सरकारी रुग्णालयांमध्ये प्रायव्हेट रुम मिळणार नाही, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केली आहे.

दिल्लीत सार्वजनिक बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाचे गिफ्ट दिल्यानंतर आता केजरीवाल सरकारने आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये व्हीआयपी संस्कृती बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही व्हीआयपी व्यक्तीला सरकारी रुग्णालयांमध्ये प्रायव्हेट रुम मिळणार नाही, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केली आहे.

सामान्य दिल्लीकरांसाठी ही महत्वाची घोषणा करताना केजरीवाल यांनी म्हटले की, “सरकारच्या दृष्टीने सर्व रुग्ण एकसारखेच आहेत. यामध्ये कोणीही खास नाही किंवा सामान्यही नाही. त्यामुळे यापुढे दिल्लीतील रुग्णालयांमध्ये सर्व नागरिकांना एकसारखेच उपचार मिळतील. या उपचारांची गुणवत्ताही वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जास्तीत जास्त लोकांना उपचार घेता यावेत यासाठी दिल्ली सरकार सार्वजनिक रुग्णालयांमध्ये १३,८९९ बेड वाढवणार आहे. सध्याची आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी टाकण्यात आलेले हे मोठे पाऊल मानले जात आहे. तसेच सर्व सार्वजनिक रुग्णालये वातानुकुलीत बनवण्यात येणार असून यामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

२०१५ मध्ये जेव्हा आमचे सरकार स्थापन झाले तेव्हा सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काय करता येईल, हेच आमचे लक्ष होते. त्याअनुषंगाने गेल्या चार वर्षात आम आदमी पार्टीच्या सरकारने एकाहून एक चांगले निर्णय घेतले. यामध्ये वीजेच्या बिलात कपात, पाणीबिल माफी, शिक्षणात सुधारणा आणि मोहल्ला क्लिनिक या सुविधांचा समावेश होता. सर्वसामान्यांना हे जाणवले पाहिजे की त्यांच्या भावनांना समजणारे असे एक सरकार आहे, हाच आमचा यामागचा हेतू होता, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजपा आणि काँग्रेसने मात्र केजरीवाल सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील सरकार सर्वच बाबींमध्ये अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता निवडणुकीचे वर्ष आल्याने सरकार स्वस्तातली लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपडत असल्याचा आरोपही भाजपा-काँग्रेसने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2019 6:31 pm

Web Title: arvind kejriwal tweets no private room to vip in government hospital aau 85
Next Stories
1 फोटो मॉर्फ करणाऱ्या विरोधात शेहला रशिदची दिल्ली पोलिसांकडे धाव
2 छत्तीसगड : लाखोंचे बक्षीस असलेल्या कमांडर, डेप्युटी कमांडरसह सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
3 नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, दहशतवादाची पाळमुळं पाकिस्तानात
Just Now!
X