साधेपणासाठी प्रसिद्ध असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येत्या काही दिवसांमध्ये उत्तर दिल्लीतील ६ फ्लॅगस्टाफ रोड येथील निवासस्थानी राहायला येणार आहेत. मात्र, येथे राहायला येण्यापूर्वी या घरातील सर्व वातानुकूलित यंत्रे काढण्यात यावी, अशी विनंती केजरीवाल यांनी दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती. परंतु, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने केजरीवाल यांची ही मागणी मान्य करण्यास नकार दर्शविला. केजरीवाल यांच्या सांगण्याप्रमाणे या घरातील वातानुकूलित यंत्रे काढल्यास त्यामागील भिंती उघड्या पडतील. त्यामुळे वातानुकूलित यंत्रांसाठी भिंतींमध्ये तयार करण्यात आलेल्या पोकळीचा प्रश्न निर्माण होईल. हा मोकळा भाग तसाच सोडता येणार नसल्याने त्याच्या दुरूस्तीसाठी पुन्हा जास्त खर्च होईल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले. मात्र, केजरीवाल यांना वातानुकूलित यंत्र नकोच असेल तर त्यांनी त्याचा वापर टाळावा किंवा वातानुकूलित यंत्राचा वीजपुरवठा खंडित करावा, असा पर्याय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून गेल्या शनिवारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे यासंदर्भातील विनंती करण्यात आली होती. यामध्ये केजरीवालांनी आपण वातानुकूलित यंत्राचा वापर करत नसल्यामुळे घरातील वातानुकूलित यंत्रे काढण्याची मागणी केली होती. मात्र, असे केल्यास या घराची रचना पुन्हा बदलावी लागेल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून हे घर रिकामे असले तरी ते चांगल्या अवस्थेत आहे. नुकताच या घराला रंगदेखील लावण्यात आला असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली. केजरीवाल यांच्या या नव्या निवासस्थानाचे क्षेत्रफळ ५,००० चौरस फुट इतके असून, या घरात एकावेळी ४० जण राहु शकतात. याशिवाय, घरासमोर हिरवळ असून घराच्या मागील बाजूस किचन गार्डनही आहे. अरविंद केजरीवाल सध्या कौसुंबी येथे राहत असून त्यांच्या घरी एकमेव वातानुकूलित यंत्र असून ते त्यांच्या आई-वडिलांच्या खोलीत लावण्यात आले आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्रिपदाच्या टर्ममध्ये तिलक रोड येथे राहत असतानाही केजरीवाल यांच्या निवासस्थानी एक वातानुकूलित यंत्र होते. मात्र, त्यांनी कधीही त्याचा वापर केला नव्हता.