दिल्लीत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घोडेबाजार सुरू असून, राष्ट्रपतींनी या परिस्थितीला आळा घालण्यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी आम आदमी पक्ष(आप) चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केली. दिल्लीच्या नायब राज्यपालांकडून कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण मिळू नये, यासाठी केजरीवाल यांनी ही मागणी केल्याचे समजते. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी भाजपला सरकार बनविण्याचे आमंत्रण देण्याचे वृत्त आल्याने ‘आप’कडून भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.
सध्या दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपकडून अनेक आमदारांना विकत घेण्यात येत असून, त्यामुळे सर्वत्र राजकीय घोडेबाजाराची परस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक संख्याबळासाठी २० कोटी रूपये देऊन आमदार विकत घेतले जात असल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेले निमंत्रण म्हणजे सरकारी अप्रामाणिकपणाचे उदाहरण आहे. मुळात सत्तास्थापनेसाठी भाजपजवळ आवश्यक ते संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी राजकीय घोडेबाजारीचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना भेटून या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याची मागणी केली असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.