आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून आपली हकालपट्टी केल्यामुळे पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज झाल्याची भावना व्यक्त करताना प्रशांत भूषण यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना खडे बोलही सुनावले आहेत. केजरीवाल यांना एकतर्फी निर्णय घ्यायला आवडत असल्याची टीकाही त्यांनी केली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तरपणे आपले मत मांडले.
ते म्हणाले, केजरीवाल यांच्यामध्ये अनेक चांगले गुण असले, तरी काही दोषही आहेत. त्यांच्या या स्वभावाबद्दल मी सातत्याने त्यांना सांगत आलो आहे. एकतर्फी निर्णय घेणे, हा असाच एक दोष त्यांच्यामध्ये आहे. त्यांचे बरेचसे निर्णय बरोबर असले, तरी काही वेळा ते चुकीचेही ठरतात. ज्यावेळी त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असे मला वाटते, त्यावेळी मी स्पष्टपणे माझी भूमिका मांडतो. लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याचा त्यांचा विचार चुकीचा होता, असे मला वाटते. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असता, तर त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे मी सातत्याने त्यांना ‘आप’च्या निर्णय प्रक्रियेचा परीघ व्यापक असावा, असे सांगत आलो आहे. त्यामध्ये स्वतंत्रपणे विचार करणाऱया काही लोकांचा समावेश करण्यात यावा, असेही माझे म्हणणे होते. या पद्धतीमुळे पक्षात कोणताही निर्णय एकतर्फी घेतला जाणार नाही, असे मला वाटते, असे प्रशांत भूषण म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून आमच्या दोघांमध्ये अबोला निर्माण झाला असल्याचे कबुल करून त्याला आपणही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे प्रशांत भूषण म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपू्र्वी दोघांमध्ये चर्चा व्हावी, यासाठी मी केजरीवाल यांच्याकडे संदेश पाठविला होता. मात्र, त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही, असेही त्यांनी सांगितले.