पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून (आप) अनपेक्षित डाव टाकण्यात आला. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल हे ‘आप’ पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले. येथील एका प्रचारसभेदरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. सिसोदियांनी केजरीवाल पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे स्पष्टपणे म्हटले नसले तरी, त्यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. केजरीवाल हेच तुमचे मुख्यमंत्री आहेत, असे समजून मतदान करा. तुमचे प्रत्येक मत हे केजरीवाल यांच्यासाठी असेल, असे सिसोदिया यांनी म्हटले. सिसोदिया यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.
Ye samajh ke vote do ki aap Arvind Kejriwal ko vote de rahe ho. Aapka vote Kejriwal ke naam pe hai: Manish Sisodia in Mohali (Punjab)
— ANI (@ANI_news) January 10, 2017
"पंजाब का मुख्यमंत्री कोई भी बने, ये @ArvindKejriwal की ज़िम्मेदारी है कि पंजाब के साथ किये हर वादे को पूरा किया जाएगा।": @msisodia
— AAP Punjab (@AAPPunjab2017) January 10, 2017
पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुका ‘आप’साठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. पंजाब आणि गोवा जिंकून २०१९च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्पर्धेत उतरण्याची त्यांची योजना आहे. दिल्लीचे मुख्यमंत्रिपद असले तरी केंद्र सरकारचे अधिकार असल्याने अनेक मर्यादा येतात. यामुळेच मोठय़ा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविण्याची केजरीवाल यांची योजना आहे. त्या दृष्टीने पंजाब जिंकून सत्ता मिळविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. पंजाबमधील ५५ टक्क्यांपेक्षा जास्त शीख मतदारांची संख्या लक्षात घेता त्यांनी स्वत:ची मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले आहे. कारण पंजाबमध्ये बिगर शीख मुख्यमंत्री स्वीकारला जाणार नाही. गोव्यात ईव्हान गोम्स यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करून केजरीवाल यांची भाजपच्या विरोधात जाऊ शकणारी ख्रिश्चन मते मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजप युती सरकारच्या विरोधातील वातावरणाचा फायदा काँग्रेस की आम आदमी पार्टी उठविते याचीही उत्सुकता राहणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 5:02 pm