* केजरीवाल यांचा सत्ता काबीज करण्याचा विश्वास
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी ‘आम आदमी’च सत्ता काबीज करेल असा विश्वास व्यक्त करत ‘यूपीए’ सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे.
“आठ डिसेंबरच्या मतमोजणीनंतर आम आदमी पक्षाच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल” असा आत्मविश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. आज दिल्लीत घेततेल्या एका जाहीर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी ‘यूपीए’वर घणाघाती टीका केली. तसेच आम आदमी पक्ष सत्तेत आल्यावर सर्वप्रथम लोकपाल विधेयक संमत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेतून त्यांनी सर्वसामान्य मतदारांना आम आदमी पक्षालाच मत देण्याचेही आवाहन केले. आम आदमी हा एकमेव पक्ष लोकांच्या हक्कासाठी भांडणारा पक्ष असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले, “दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर २९ डिसेंबर रोजी आम्ही अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेले लोकपाल विधेयक संमत करू, आमचा पक्ष सत्तेत आला तर लोकपाल विधेयक संमत करण्यासाठी आम्ही रामलीला मैदानावर विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊ आणि या खुल्या अधिवेशनातच आम्ही लोकपाल विधेयक संमत करून घेऊ”