अरविंद केजरीवाल यांचा केंद्राला सल्ला
दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाबाबत जर केंद्र सरकारला हरकत असेल, तर त्यांनी न्यायालयात जावे. आप या निर्णयापासून मागे हटणार नाही, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात उगारलेली चौकशीची तलवार म्यान करणार नसल्याचे सूतोवाच केले.
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी चौकशी आयोगाच्या न्यायिक वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्राला या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती.
जंग यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात १९५२च्या चौकशी आयोग कायद्यानुसार अशा प्रकारचा आयोग नेमण्याचा अधिकार केवळ केंद्र व राज्य सरकारला असल्याचे नमूद केले होते; परंतु दिल्ली केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे नायब राज्यपालांमार्फत केंद्राच्या अनुमतीने सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेता येऊ शकतो, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.