आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे जून महिन्यांचे वीजबिल आहे १ लाख ३६ हजार रुपये. गेल्या एप्रिल-मे महिन्यात त्यांच्या घराचे वीजबिल ९१ हजार रुपये आल्यानंतर सर्वसामान्य जनतेने आश्चर्य व्यक्त केले होते. त्याचबरोबर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर जून महिन्यात आधीच्या महिन्यापेक्षा जास्त वीजबिल आल्याने केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा टीका होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील सिव्हिल लाईन्स भागात सहा फ्लॅग स्टाफ रोड येथे केजरीवाल यांचे सरकारी निवासस्थान आहे. या निवासस्थानामध्ये विजेचे दोन मीटर बसविण्यात आले आहेत. या दोन्ही मीटरचे मिळून आलेले वीजबिल १ लाख ३६ हजार रुपये इतके आहे. या निवासस्थानी एकूण ३० वातानुकूलन यंत्रे बसविण्यात आली आहे. त्यापैकी किती केजरीवाल यांच्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक वापरासाठी आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. एकूण आलेल्या वीजबिलापैकी केजरीवाल यांच्या वैयक्तिक वापराच्या खोल्यातील बिल किती आणि सरकारी कामकाजासाठी वापरलेले विजेचे बिल किती हे सुद्धा स्पष्ट झालेले नाही. केजरीवाल यांच्या निवासस्थानी असलेल्या दोन मीटरपैकी एका मीटरचे जून महिन्याचे बिल ११३५९८ रुपये इतके असून, दुसऱया मीटरचे बिल २२६८९ रुपये इतके आहे.
दरम्यान, दिल्ली सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल स्वतःसाठी वापरत असलेल्या निवासस्थानाचे वीजबिल अत्यंत कमी आहे. निवासस्थानातील जो भाग सरकारी कामासाठी वापरला जातो. तिथे पक्षाच्या काही बैठका होतात. त्याचबरोबर जनता दरबार भरवला जातो. त्या ठिकाणी विजेचा वापर तुलनेत जास्त असल्यामुळे तेथील वीजबिल अधिक असेल. याचा तपशील मागविण्यात आला आहे.